मुंडे बंधूंच्या मतदार संघात प्रशासनाने केले दोन खून, तारामतीचा न्यायासाठी संघर्ष सुरूच

बीड येथे २६ जानेवारीपासून तारामती साळूंके ही महिला स्मशानात एकटी आंदोलनाला बसली आहे. तिच्या आंदोलनाचे दहा दिवस उलटून गेले तरी तिच्याकडे पहायला व तिची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही. खरेतर तिची व्यथा आणि कथा अंगावर काटा आणणारी आहे. तारामतीच्या कुटूंबाची जमीन सरकारने वीस वर्षापुर्वी संपादित केली आहे. वीस वर्षापुर्वी राज्याच्या पाटबंधारे खात्याने ही जमीन संपादित केली. बीड जिल्ह्यातील पाली या गावचे हे कुटूंब आहे.

वीस वर्षापासून शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मागत आहेत. तो आजतागायत मिळाला नाही. गेल्या वीस वर्षापासून तरामती व तिचे कुटूंब न्यायासाठी संघर्ष करत आहेत. न्यायासाठी झगडणा-या तारामती साळूंकेने आपला पती गमावला, आपली सासू गमावली तरी पदरात न्याय पडला नाही. घरातली दोन कर्ती माणसं न्याय मागत मागत यमसदनी गेली पण त्यांना न्याय मिळाला नाही.