मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आज (१० एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली, त्यानंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar)यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटून उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना यशवंत किल्लेदार म्हणाले की,‘मुळात ज्यांनी हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलंय, त्यांना देखील जाग यावी हा देखील त्यामागचा उद्देश आहे’, असे किल्लेदार म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी ३ एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील पक्ष कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली होती. कल्याणमधील साई चौकातील पक्ष कार्यालयाबाहेर मनसेचे स्थानिक कार्यकर्ते जमले आणि त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून मोठ्याने घोषणा दिल्या. तसेच त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या. मनसे कल्याण विभागाचे अध्यक्ष उल्हास भोईर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन करण्यास कार्यकर्ते कधीही मागेपुढे पाहणार नाहीत. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनसे कार्यकर्ता महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले, त्यानंतर ३ एप्रिललाच त्यांची सुटका करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
- मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा
- “…यामागे मोठे षडयंत्र”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “त्या” कीर्तनकारांचे नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी – तृप्ती देसाई
- “एसटी कामगारांना सांगत होतो…ऐकलं नाही” – अजित पवार
- अनिल बोंडे यांच्या विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार दाखल


