Share

‘तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना…’, संजय राऊतांनी व्यक्त केल्या भावना

Published On: 

मुंबई : रविवारी शिवाजी पार्कच्या मैदानावर तिरंग्यात लपेटलेल्या लतादीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन साऱ्या जगाने घेतले. सैन्य दलाने बिगुलावर वाजवलेली शोकमग्नधूनही साऱ्यांनी ऐकली, मंत्रोच्चारात पेटलेली चिताही उघड्या डोळ्यांनी पाहिली. पोलिसांनी अखेरची मानवंदना म्हणून झाडलेल्या बंदुकीच्या फैरींचा कानठळ्या बसविणारा आवाजही अजून कानात घुमतो आहे. पण मन मात्र यापैकी काहीएक मानायला तयार नाही. कारण एकच, लता मंगेशकर अजूनही मनामनांत, कानाकानांत आणि प्रत्येकाच्या रोमारोमांत जिवंत आहेत. लतादीदी अनंतात विलीन झाल्या हे अजूनही कुणाच्या मनाला का पटत नाही? लता मंगेशकर हे जग सोडून गेल्या, हे मान्य करायला अजूनही मन का धजावत नाही? ते मान्य करावे तरी का? दीदींनीच गायलेल्या ‘अनाडी’मधील गाण्याच्या शब्दांत सांगायचे तर ‘तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना…’ अशा भावना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त केल्या आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘आलम् दुनियेची आज अशीच अवस्था झाली आहे. गानसम्राज्ञी लतादीदींच्या ओठांवर, जिव्हेवर आणि कंठातही साक्षात सरस्वतीचेच वास्तव्य होते. त्याशिवाय का हा दैवी सूर एवढा लोकप्रिय झाला, रसिकांच्या हृदयांत विसावला! रविवारी सकाळी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला, त्याच्या आदल्याच दिवशी देशभरात वसंत पंचमीचा सण साजरा झाला. वसंत पंचमी म्हणजे कला आणि विद्येची स्वामिनी असलेल्या सरस्वती मातेच्या आगमनाचा पवित्र दिवस. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ठिकठिकाणी सरस्वती देवीला निरोप देऊन विधीवत विसर्जन केले जाते. वीणावादन करत धरतीवर अवतीर्ण झालेल्या माँ सरस्वतीचे पूजन-अर्चन करून निरोप देण्याची तयारी देशभरातील श्रद्धाळू जनता करत असतानाच लतादीदी नावाचा पृथ्वीतलावरील साक्षात सरस्वतीचा अवतारही अंतर्धान पावला. जणू आपल्या लाडक्या कन्येला निजधामी नेण्यासाठी साक्षात सरस्वतीच स्वर्गलोकातून भूलोकी अवतरली आणि त्रिखंडाला जिंकून घेणाऱ्या लेकीसह अदृश्य झाली.’

पुढे ते म्हणाले की, ‘अनंताच्या प्रवासाला निघालेली ही गानकोकिळा निःसंशय स्वर्गलोकी पोहचेल, तेव्हा तिच्या स्वागतासाठी समस्त देवादिक हात जोडून उभे असतील. स्वर्गातील पहिल्या मैफिलीची तयारीही पूर्ण झाली असेल. नऊ दशकांसाठी पृथ्वीवर पाठविलेला स्वर्गीय सूर कित्येक वर्षांनी ऐकायला मिळणार म्हणून ३३ कोटी देवांचे कान आतुर झाले असतील. १३ वर्षांच्या लाडक्या कन्येला पोरकी करून देवलोकी गेलेले मास्टर दीनानाथ लतेचा मंजूळ स्वर साठवून ठेवण्यासाठी कानांत प्राण आणून वाट पाहत असतील.’

दरम्यान, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, रविशंकर यांच्या बरोबरीने मोहंमद रफी, मुकेश, तलत मेहमूद, किशोरदा ही गायक मंडळी पुन्हा एकदा लताचा स्वर ऐकायला मिळेल म्हणून आनंदली असतील. उत्तम साथसंगत करण्यासाठी आधीच जाऊन पोहचलेले मदन मोहन, नौशाद, खय्याम, गुलाम महंमद, शंकर जयकिशन, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू या संगीतकार मंडळींनीही वाद्यवृंद सज्ज ठेवला असेल. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’ हे आपले अजरामर गीत पुन्हा एकवार ऐकण्यासाठी खुद्द तात्याराव सावरकरही एका तळमळीने वाट पाहत असतील, असेही राऊत म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!