मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात नवा वाद निर्माण झाला आहे. देहू, पुणे येथील मंदिराच्या उद्घाटन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंदिराच्या उद्घाटन समारंभात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बोलू दिले गेले नाही.
या प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले नाही.”
“वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!”, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला आहे.
हा महाराष्ट्राचा अपमान –
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले असून, ही गंभीर बाब आहे. हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि प्रोटोकॉल अंतर्गतच दिल्लीतील कार्यालयात भाषणासाठी पत्र लिहिले, परंतु प्रतिसाद आला नाही.
भाजपचे स्पष्टीकरण-
देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नकता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खासगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही. हे लक्षात घ्या) असे भाजपने म्हटले आहे.
तसेच नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपसाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राच द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत स्वतःचा अहंकार नाही. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काही एक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे त्यामुळे त्यांना औषध नाही, असा टोलाही भाजपने लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

