🕒 1 min read
Explained Jitendra Awhad Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे शहरातील एका मल्टिप्लेक्समध्ये घुसून ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याची घटना घडली होती. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला. हा वाद नेमका काय आहे. आव्हाडांनी चित्रपटाला विरोध का केला हे जाणून घेऊया.
अभिजित देशपांडे दिग्दर्शीत ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. अभिनेता सुबोध भावे याने चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली. या चित्रपटाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप होत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने केला. शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला होता.
आव्हाडांचा चित्रपटाला विरोध का?-
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटावर टीका केली होती. “हर हर महादेव, या सिनेमात विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांची भूमिका –
अभिषेक देशपांडे म्हणाले, “आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही चुकीचा इतिहास दाखवत नाही आहोत. तर, हर हर महादेव या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्यावरच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. आमच्याकडे चित्रपटाशी निगडित सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ आहे. CBFC च्या पॅनल मध्ये अनेक इतिहास तज्ञ देखील असतात त्यांनी सगळे तपशील बघूनच या चित्रपटाला मान्यता दिली आहे. हर हर महादेव चित्रपटांमध्ये जर चुकीचा इतिहास असता तर या पॅनल कडून चित्रपटाला मान्यता मिळाली नसती. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे.”
तर दुसरीकडे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद करण्यात आला. या घटनेवर अभिजीत देशपांडे म्हणाले, “चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांवर चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर त्यांचे कपडे देखील काढण्यात आलेले आहे. दरम्यान, अनेक प्रेक्षकांवर शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. एकीकडे आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे भक्त म्हणतो आणि दुसरीकडे त्यांचे विचार न समजून घेता शिवीगाळ आणि मारहाण करतो.”
संभाजीराजे छत्रपती यांचाही चित्रपटावर आक्षेप –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमधून इतिहासाची मोडतोड होत असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलाय. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवले जात असतील, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा थेट इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. या चित्रपटांतील मावळ्यांची वेशभूषादेखील ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला आहे.
महेश मांजरेकर (Mahesh manjarekar) दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. यात मावळ्यांच्या भूमिका साकारत असलेल्या कलाकाराच्या पोशाखावर संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे. “इतिहासाचा गाभा धरून राहावा ना. यातील काही मावळ्यांनी पगडी घातली नसून, तो शोक संदेश आहे. जर, यापुढे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांनी असेच चित्रपट काढले तर, गाठ संभाजी छत्रपतीशी आहे,” थेट इशारा त्यांनी मांजरेकर यांना दिला आहे.
“मी शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या घराण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यात एकही टक्का बदल होणार नाही. उद्या परत असा चित्रपट काढला, तर मी आडवा येईल. त्यावेळी आणखी कोण आडवं येतं ते बघू”, असं आव्हान संभाजीराजेंनी केले आहे.
“इतिहास कुठे घेऊन जायचा, इतिहासाचा गाभा सोडून लोक जात आहेत. तुम्ही चित्रपट काढता चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतंय म्हणून विपर्यास करून चित्रपट पुढे आणायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव म्हणतात आणि आपण इतिहासाचा विपर्यास करायचा?”, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केलाय.
“सिनेमॅटीक लिबर्टी, स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं? अहो भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्या. आमची सुद्धा चूक आहे. आपल्या लोकांची देखील चूक आहे. आपण शिवाजी महाराजांची पुस्तके वाचत नाहीत. वा.सी.बेंद्रे, मेंधळे, जयसिंगराव पवार सर असतील, या लोकांनी इतिहास लिहिताना आयुष्य घालवलं. लोकांना नाट्यरुपांतर आवडतं म्हणून त्यामध्ये काहीही बदल करायचा?”, असा सवाल त्यांनी केला.
अटकेनंतर जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण –
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवायचे असेल, तर ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Supriya Sule | आव्हाडांवरील कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या , “…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते”
- Haunted Railway Station | ‘हे’ आहेत भारतातली सर्वात भयानक रेल्वे स्टेशन
- Amol Mitkari | “देशी गुंडांच्या नादाला लागून सरकारने…” ; जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर अमोल मिटकरींची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
