🕒 1 min read
Shiv Sena vs BJP । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ४० आमदार आहेत. याशिवाय काही खासदारही शिंदे यांच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदारांच्या बंडाचे प्रकरण अद्याप उघडकीस आलेले नाही. मात्र, सोमवारी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ७ खासदार आले नव्हते. त्यामुळे हे खासदार शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले काही खासदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान खासदारांची मागणी मान्य करत उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे. पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना नरमली आहे. त्यामुळे शिवसेना – भाजप आता एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही गटाकडून मोठे संकेत देण्यात आले आहेत.
२०१९ मध्ये काय घडले होते?
२०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने १०५ जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाले. प्रकरण इतके वाढले की, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. जास्त जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षातच राहावे लागले. अडीच वर्षांनंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसैनिक आमदारांनी बंड केले. शेवटी शिंदे यांनीच ४० बंडखोर आमदार आणि भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता.
दरम्यान, एकनाथ शिंदे गट आणि भाजपमधून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात असली तरी काही मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढू लागली असल्याचे संकेत मिळत आहेत.
द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. शिंदे गट आधीच भाजपला पाठिंबा देत आहे. अशा स्थितीत शिवसेनेचे आमदार आणि खासदार दोघेही द्रौपदी मुर्मूच्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट आहे.
संजय राऊत सुचक ट्विट
खासदारांच्या भेटीनंतर आज सकाळी संजय राऊत यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. ‘अब नहीं कोई बात खतरे की… आता सगळ्यांना सगळ्यांपासून धोका’ असं लिहिलं आहे. हे ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. सोमवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत संजय राऊत हे एकमेव सदस्य होते ज्यांना विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्यायचा होता, पण उद्धव ठाकरे यांनी ते मान्य केले नाही, असे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या गटातील आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सोमवारी राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमांतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात शिंदे आणि उद्धव या दोन्ही गटांच्या आमदारांची नावे आहेत, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आदित्य ठाकरेंना ही नोटीस बजावण्यात आलेली नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना नोटीस न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
ठाकरे कुटुंबाविरोधात भाजप नेते काहीही बोलणार नाही
ठाकरे कुटुंबाविरोधात भाजपे नेते काहीही बोलणार नाहीत, असा निर्धार भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे. असा खुलासा खुद्द शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकर म्हणाले होते, “आम्ही भाजपसोबत जाताना ठरवलं होतं की, आमच्या पक्षप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात काहीही बोलायचं नाही. ताज हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. किरीट सोमय्या यांनी आमच्या पक्षप्रमुखांवर टीका केली. फडणवीस यांच्याशी बोललो. ठाकरे कुटुंबाविरुद्ध काहीही नकारात्मक बोलायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे, असे त्यांनी मान्य केले.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
