नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवाराच्या नावावर आज कोणताही निर्णय होऊ शकला नाही. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांना उमेदवारी देण्यास सांगितले, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. याआधीही त्यांनी अनेकदा नकार दिला होता. आता नव्या नावावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांची पुढील आठवड्यात पुन्हा एकदा दिल्लीत बैठक होणार आहे. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी अजूनही सक्रिय राजकारणात असून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची नाही.
बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “ही फक्त सुरुवात आहे. आम्ही शरद पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती, पण ते मान्य झाले नाहीत. अशा परिस्थितीत सर्व पक्ष पुन्हा एकदा उमेदवाराचा विचार करतील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करतील”.
गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप पक्षांच्या २२ नेत्यांना पत्र लिहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समान उमेदवार देण्याची मागणी केली होती. ममता यांनी ज्या पत्रांना 8 राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश होता.
आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला यांना प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. जेडीएसचे एचडी देवेगौडा आणि कुमारस्वामीही पोहोचले होते. सपा नेते अखिलेश यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती आणि एनसीचे ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते.
गुरूवारीच निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
