🕒 1 min read
मावळ (पुणे) : देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाची संधी डावलल्याबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत मत व्यक्त केले आहे. अजित पवार यांना भाषण करू न देणे हे भाजपाचा पूर्वनियोजित कट होता, तो त्यांनी यशस्वी केला, असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
काल देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा सोहळा पार पडला. मात्र सभेदरम्यान पालकमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. याचमुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघात देहूगाव आहे. मात्र तरी त्यांना सामान्यांप्रमाणे आमंत्रित केले होते.
सुनील शेळके म्हणाले, की कार्यक्रमाचा प्रोटोकॉलनुसार खासदार, आमदार, महापौर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करायला हवे होते. यासंबंधीची कोणतीही जबाबदारी देहू संस्थान किंवा पंतप्रधान कार्यालयाने आमच्याकडे दिली नाही. बहिष्कार कार्यक्रमावर नसून कार्यक्रमाची जी व्यवस्था करण्यात आली होती, यावर नाराजी असल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम पूर्णतः भाजपाचा होता. नियमाप्रमाणे आम्हाला निमंत्रण न देता केवळ कार्यकर्त्याप्रमाणे बोलावण्यात आले. जिथे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आम्ही असायला हवे होतो, त्याठिकाणचे निमंत्रण आम्हाला नव्हते. विशेष म्हणजे आम्हाला मंदिरातही प्रवेश नव्हता.
मंदिराच्या कार्यक्रमात केवळ संस्थानचे काही लोक आणि भाजपाचे लोक होते. व्यासपीठावरदेखील स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्षा यांना जागा दिली गेली नाही. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचा बेताल वक्तव्ये करणाऱ्या कोणीतरी तुषार भोसले नावाच्या व्यक्तीला व्यासपीठावर स्थान देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना स्थान देण्यात आले, मात्र स्थानिक नेत्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो कार्यक्रम केवळ भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचा होता, भाजपा पुरस्कृत होता, असा आरोप शेळके यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
