🕒 1 min read
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबाद येथे सभा संपल्यानंतर शिवसैनिकांच्या भरधाव वाहनाने मोपेडवर उभ्या कुटुंबाला चिरडल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री एपीआय कॉर्नर या भागात घडली. या अपघातामध्ये त्या कुटुंबातील चार वर्षीय चिमुकली मुलीचा मृत्यू झाला. तर मुलीचे आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी पोलिसांनी संबंधित चालकाला अटक केली आहे. विभा उर्फ श्रावणी सतीश राऊत (वय-४ वर्षे रा. एन-६ सिडको) असे अपघातात मरण पावलेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश जगन्नाथ राऊत (वय ४०), त्यांची पत्नी अनिता (वय-३०), आणि त्यांची मुलगी विभा असे तिघेही मोपेड वाहनावर नातेवाईकाच्या घरी गेले होते. रात्री तेथून घराकडे परतत होते, एपीआय कॉर्नरच्या उड्डाणपुलाखालून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात वाहने जात होती. त्यामुळे सतीश यांनी त्यांचे मोपेड वाहन थांबवले आणि वाहने जाण्याची वाट पाहत होते. चिमुकली मुलगी विभा मोपेडच्या समोर उभी होती. तर पत्नी अनिता पाठीमागे बसल्या होत्या.
त्याचवेळी औरंगाबादकडून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या (एम.एच.२५ ए.जे. १७६९) या क्रमांकाच्या बोलेरे वाहनाचा ताबा सुटला व उड्डाणपुलाखाली उभ्या सतिश यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. बोलेरो धडकताच मोपेडच्या समोर उभी असलेली मुलगी विभा दूरवर फेकल्या गेली. यावेळी विभाच्या अंगावरून बोलेरो गेली. अपघातानंतर बोलेरो चालक वासुदेव माने (रा.उस्मानाबाद) हा पळून गेला होता. जमलेल्या नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या हवाली केले. बोलेरो वाहनात शिवसैनिक होते. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेवरून उस्मानाबाद येथे जात होते. चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
