मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. अनेक दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई बाहेर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष होतं. औरंगाबाद नामांतर मुद्दा हा सभेचं आकर्षण होतं. सभास्थळी मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं, त्यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरेही होत्या. मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी. यापूर्वी गळ्यात शिवसेनेचं भगवं उपरणं घातलेलं तेजस ठाकरेंचं चित्र कधी दिसलं नव्हतं. तेजस ठाकरे – रश्मी ठाकरे मायलेक व्यासपीठावर नाही, तर मंचासमोर बसले होते. परंतु औरंगाबादमधून तेजस ठाकरे यांचं राजकीय लाँचिंग होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
नेहमी राना-वनात निसर्गात रमणारे, जीवांच्या नव्या प्रजाती शोधण्यात रस असणारे तेजस ठाकरे राजकीय व्यासपीठावर फार कधी दिसत नाहीत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात होते, त्यावेळी काही मोजक्या प्रचार रॅलींना तेजस ठाकरेंनी प्रचारासाठी हजेरी लावली होती. नंतर आदित्य ठाकरे निवडून आले, उद्धव ठाकरेंकडे ही मुख्यमंत्रिपद आले, नंतर आदित्य ठाकरे यांची थेट कॅबिनेटमध्ये वर्णी लागली, परंतु वडील आणि दादा मंत्रिपदावर असतानाही तेजस ठाकरे राजकीय पटलावर दिसत नव्हते.
दरम्यान तेजस ठाकरे यांनी साप, खेकडे यांच्या काही नव्या प्रजातींचा शोध लावला. राना-वनात निसर्गात रमणारे तेजस ठाकरे मात्र सक्रीय राजकारणापासून दूरच राहिले होते. यापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी तेजसचा कल राजकारणाकडे नसल्याचं सांगितलं होतं. परंतु आगामी मुंबई आणि इतर मनपा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे कुटुंब संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार का, असा सवाल विचारला जात आहे. यात तेजस ठाकरे यांचा सक्रिय सहभाग राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :


