मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून चर्चा करण्यास सांगितले होते. राज्य सरकारने १२ सदस्यांची नावे पाठवून ८ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. राज्यपालांनी या आमदारांची नियुक्ती लवकरात लवकर करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीन दिग्गज मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची दि. २६ ऑगस्ट रोजी भेट घेणार होते. राज्यपालांनी भेट घेण्यास सांगितले असल्याचे यापूर्वी अजित पवार यांनी स्पष्ट केलं होते. मात्र, ऐनवेळी भेटीची वेळ घेतली नसल्यामुळे राज्यापालांनी भेट नाकारली आहे.
त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटीची वेळ दिल्याचे समजते आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामुळे आज तरी १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२६ ऑगस्ट रोजी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीसाठी वेळ द्यावी, अशी विनंती केली. मात्र, दिवसभर राज्यपालांचे पूर्वनियोजित पाच कार्यक्रम होते. त्यामुळे राजभवनाकडून ऐनवेळच्या भेटीला नकार देण्यात आला. भेटीची वेळ घेण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर गुरुवारी रात्री राजभवनवर गेले. ‘माझे पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि शिष्टमंडळ येणार असल्याची पूर्वकल्पना दिलेली नव्हती. लगेच वेळ देता येणे शक्य नाही’ असे राज्यपालांनी नार्वेकर यांना सांगितले. दिल्ली दौऱ्यावरून आज १ सप्टेंबरला राज्यपाल मुंबईत परतणार होते. त्यामुळे आजच त्यांची भेट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी १२ नावे निश्चित केली होती. या १२ जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. तर, काँग्रेसकडून रजनी पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर यांचा समावेश आहे. तसेच, शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रामाची नियत खराब होती जयकुमार गोरेची चांगली आहे’ ; भाजप आमदारचे वादग्रस्त विधान
- ‘राज्याला बंदिवान केल्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर’, भाजपचा टोला
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक


