मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या ३० बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा असे घडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. अडीच वर्षे सरकार ठीक चालले होते पण आता काय चालले आहे, यावर मी माझ्या सहकाऱ्याशी बोलेन. महाराष्ट्रात बदलाची गरज नाही, असे ते म्हणाले. शिंदे यांची नाराजी ही शिवसेनेची अंतर्गत बाब असल्याचे शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी आपल्याला याबाबत कधीच सांगितले नाही. ही शिवसेनेची अंतर्गत बाब आहे, ते जे काही निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सरकार बदलण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही.”
तसेच बहुमत गमावल्यास भाजपसोबत जायला आवडेल का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
महत्वाच्या बातम्या :


