औरंगाबाद – राज्यावर सध्या डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे काळे ढग दाटू लागले आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण वाढू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये तसेच डेल्टा प्लसपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
एका बाजूला ही परीस्थिती असताना दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींनी मात्र नियमांचे उल्लंघन करण्याचा धडाका लावल्याचे चित्र आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. पुढे चौफेर टीका झाल्यानंतर पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हे प्रकरण ताजे असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या नव्या शासकीय नियमांमुळे सोलापूर शहरात देखील सायंकाळी पाच नंतर संचारबंदी आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रभागात जाहीर रात्री कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हता. शिंदे यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे.
तिसरी घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये एका कव्वाली च्या कार्यक्रमात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली होती. या कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रम, पार्ट्या आणि हॉटेल्संना रात्रीची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांच्यासाठीच हे नियम भंग करुन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमातील उपस्थितांची संख्या १०० पेक्षा जास्त होती. त्यांनी मास्क घेतला नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
एका बाजूला सामान्य जनतेला सरकार नियमांचे पालन करण्यासाठी सांगत असताना दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधीच नियमांचे उल्लंघन करत आहेत. छोट्या-मोठ्या नियमांचे उल्लंघन केल्यास सामान्य जनतेवर दंड वसूल करण्यापासून गुन्हे दाखल करण्यापर्यंत प्रश्न पावले टाकताना दिसते. मग या नियम मोडणाऱ्या नेत्यांवर का काहीच कारवाई केली जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीआहे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- हकालपट्टीनंतर दोन आठवड्यात अझरुद्दीनने केले पुनरागमन
- संजय राऊत यांना विरोधकांना उपदेशाचे डोस पाजण्याचा नैतिक अधिकार आहे का ?
- मिताली राजबद्दलचं मत बदललं, रमेश पोवार म्हणाले…
- ‘झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या सह-कलाकाराला अटक
- ‘बंदुक आणि रक्ताने माखलेला शर्ट’ आदित्यच्या नव्या पोस्टमुळे चाहते झाले थक्क
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

