Share

महाविकास आघाडीत धुसफूस नेमकी का सुरु आहे ?

Published On: 

पुणे – महाविकास आघाडीत सध्या छुपे शीतयुद्ध सुरु आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षात अविश्वासाचे वातावरण तयार झाले असून सर्व पक्ष एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहे. यातच काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कॉंग्रेसची भूमिका ही एक पक्ष म्हणून योग्य असली तरीही महाविकास आघाडीचा एक प्रमुख भाग असलेल्या एका मोठ्या पक्षाने अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अडचण झाली आहे.उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून फटकारल्यानंतर देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. यामुळेच काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि खुद्द मुख्यमंत्री नाराज आहेत अशी परिस्थिती आहे.

दुसऱ्या बाजूला पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसची नाराजी वाढली आहे. उर्जामंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मुद्द्यावरून आमनेसामने आल्याचे देखील पाहायला मिळाले होते. नितीन राऊत यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून देखील याबाबत सरकारने अपेक्षित पावले न उचलल्याने नाराजी वाढली आहे. फक्त पदोन्नती आरक्षणच नव्हे तर मराठा,ओबीसी आणि धनगर आरक्षण हा मुद्दा देखील या तिन्ही पक्षांसाठी अडचणीचा ठरत आहे.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अविश्वास व्यक्त केलाय. हा देखील मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. या मुद्द्यामुळे भाजपला गुदगुल्या होत असल्या तरीही महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितले जात आहे. भाजपशी जुळवून घ्या या प्रताप सरनाईक यांच्या सल्लामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल अविश्वासाचं वातावरण आहे.

सरकारमध्ये आपली कामं होत नसल्याची किंवा विश्वासात घेतलं जात नसल्याची शिवसेनेच्या आमदारांची तक्रार आहे. याशिवाय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकांतातील भेटीमुळे कॉंग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. राष्ट्रवादी-शिवसेना आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे बोलले जात असल्याने कॉंग्रेसच्या अडचणी वाढणार हे देखील निश्चित आहे.

नुकतीच मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या एका निर्णयाला स्थगिती दिली.मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता ही स्थगिती दिल्याने नाराजी वाढली आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाबाबत तोडगा काढून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरीही सरकारवर होल्ड कुणाचा आहे हेच मुख्यमंत्र्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.शेतकरी, गरिब, विद्यार्थी आणि इतरही सर्वसामान्य घटकांचे अनेक प्रश्न आहेत. विदर्भातील धान, सोयाबीन उत्पादक, उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक, कोकणातील शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. लागोपाठ दोन वादळांनी त्यांना मोठा फटका बसूनही कोणतीही मदत न मिळण्यामागे काही राजकीय कुरघोड्या तर नाहीत न असा देखील सवाल उपस्थित करायला जागा आहे.

सत्ताधारी पक्षातील नेते विविध वादात अडकत आहेत, प्रसंगी एकमेकांवर टीका करायला देखील मागेपुढे पाहत नाहीयेत. विजेच्या प्रश्नावर राज्य सरकारने पूर्णत: घोळ घातला आहे. लोकांकडून मनमानी वसुली केली जाते आहे. लागोपाठ शाळा, महाविद्यालये बंद असताना, परीक्षा होत नसताना विद्यार्थ्यांचेही मोठे प्रश्न आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती रसातळाला गेली आहे हे सर्व प्रश्न सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याने निर्माण झाल्या असल्याचं सांगितले जाते. यामुळेच महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचे दिसून येते. जर समजा काही कारणास्तव सरकार कोसळलेच तर कुणाला तरी व्हिलन ठरवले जाईल तो व्हिलन आपला पक्ष असू नये म्हणून देखील ही धुसफूस सुरु असण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!