मुंबई – शिवसेनेकडून कॉंग्रेसला चिमटे काढण्याचे काम सुरूच असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांची देहबोली आता बदललेली दिसते व देशाची एकंदरीत परिस्थिती बरी नसून आपले नियंत्रण राहिलेले नाही हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसते. लोकांत रोष, अप्रीती असली तरी सरकारला आणि भाजपला धोका नाही या आत्मविश्वासाची ठिणगी आजही त्यांच्या मनात आहे ती कमजोर, विस्कळीत पडलेल्या विरोधी पक्षाचा अवतार पाहून असं स्पष्ट मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.
‘युपीए’ नावाची संघटना आहे, पण देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे काय? हा प्रश्न लटकूनच पडला आहे. पवारांच्या घरी ‘राष्ट्रमंच’चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. निदान त्यासाठी तरी ‘राष्ट्रमंच’वाल्यांचे आभार मानायला हरकत नाही असंही शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं आहे.
खरतर शिवसेनेने कॉंग्रेसला डिवचण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी UPAच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना बसवावे अशी मागणी करून देखील शिवसेनेने कॉंग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. याशिवाय नुकतीच शिवसेनेने कॉंग्रेसच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मुद्द्याची देखील खिल्ली उडवली होती. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून फटकारले होते.
दरम्यान,कॉंग्रेससोबतची आघाडी ही मजबुरीतून शिवसनेने केली आहे हे सर्वश्रुत आहे. याशिवाय खा. शरद पवार यांच्याशी खा. संजय राऊत यांच्या असलेल्या जवळीकीतूनच शिवसेना कॉंग्रेसला वारंवार डिवचत असते असे म्हटले तरी देखील वावगे ठरणार नाही. मात्र या मुद्द्याचा आणखी एक पैलू पाहिला तर कॉंग्रेसची सध्याची अवस्था पाहिली तर ही टीका म्हणजे वस्तुस्थिती देखील असल्याचे विसरून चालणार आहे. या टीकेतून बोध घेत देशपातळीवर कॉंग्रेसने मजबूत विरोधी पक्षाची भूमिका निभावावी अशी शिवसेनेची अपेक्षा सुद्धा असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- नानांनी हाती घेतलं ‘धनुष्यबाण’; काँग्रेसने ट्विट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
- पुणेकरांनो काळजी घ्या…आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक !
- ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा’; अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- सुप्रिया सुळेंच्या ट्विटनंतर महिला पत्रकार-लेखिका अयुब यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !


