पुणे – राज्यात सध्या मराठा,ओबीसी,धनगर आदी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात पडसाद उमटताना दिसत आहेत. यातच आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर येताच ओबीसी समाजाचे सर्व मंत्री एकत्र येतात, मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात, खरं तर हेच मराठा समाजाचं मोठं दुर्दैव आहे असा घणाघात भाजपनेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना या कित्येक मराठा तरुणांच्या मनातील आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने चक्का जाम आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे सरकारमधील ओबीसी समाजातील मंत्रीही एकजूट झाले आहेत. लोणावळ्यातल्या ओबीसी व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबिर पार पडलं. या शिबिराच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या सोबतच मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपमधील नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवत आरक्षण मिळवण्याबद्दलचा निर्धार व्यक्त केला. ओबीसी आरक्षणासाठी समाजातील सर्व मंत्री आणि नेते एकत्र आल्याचं बघायला मिळालं. यामुळे आता ओबीसी मंत्र्यांच्या प्रमाणे मराठा समाजाचे मंत्री ऐक्य का दाखवत नाहीत हा सवाल आता उपस्थित व्हायला लागला आहे.
मराठा समाजाचे अनेक दिग्गज नेते हे मंत्रिमंडळात आहेत मात्र हे नेते केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यातच दंग असल्याचे पाहायला मिळते. गरज पडली तर ओबीसी मंत्री मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यायला तयार होतात मात्र मराठा समाजाचे मंत्री मात्र बोटचेपी भूमिका का घेतात असा सवाल आता मराठा समाजातील तरुणांच्या पुढे आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सत्ताधारी विरोधकांना टार्गेट करतात तर विरोधक सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याचे काम करत असतात. सर्वपक्षीय नेते हे मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करू नका असं सांगतात मग मुख्यमंत्री पंतप्रधानांना या प्रश्नी भेटायला जातात तेव्हा त्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेत्याचा समावेश केला का केला जात नाही हा देखील मुख्य प्रश्न आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याची तयारी सर्व ओबीसी नेते दाखवतात ती तयारी मराठा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी का दाखवली नाही असा मुद्दा उपस्थित केला जाणे स्वाभाविक आहे. आज मराठा समाजातील तरुण हा प्रचंड अस्वस्थ आहे. या तरुणांना सध्या सुरु असलेल्या राजकारणात काडीचाही रस नसल्याचे दिसून येते. मराठा आरक्षण नेमके कुणाच्या चुकीमुळे गेले ही उनिधुनी काढत बसण्यापेक्षा गेलेले आरक्षण पुन्हा कसे मिळेल या साठी प्रयत्न केले जावेत हीच अपेक्षा आज मराठा तरुण व्यक्त करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- आमचे देशमुख तर तुमचे दरेकर; भाजप नेत्यांच्या मागेही लागणार चौकशीचा ससेमिरा ?
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- मंत्री पदाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचं ‘ते’ दुखणं तसं जुनेच आहे


