🕒 1 min read
पुणे – ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी जाहीरपणे मनातील सल बोलून दाखवली आहे. आपल्या भाषणातून व्यक्त केलेली त्यांनी नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला असून हा काँग्रेससह महाविकास आघाडीला घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपद, महसूल, अर्थ या खात्यांना महत्व दिलं जातं. मात्र, वडेट्टीवार यांना या पैकी खात मिळालं नसल्याने त्यांनी खंत आज बोलून दाखवली. महत्वाची बाब म्हणजे वडेट्टीवार यांनी आपली खंत बोलून दाखवली त्यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.
ओबीसी मंत्रालय तुमच्याच राज्यात झाले, ते बरे झाले कारण ते मंत्रालय तयार झाले म्हणून मला मिळाले. पण जेव्हा मिळाले तेव्हा तेथे चपराशीही नव्हता, तोही भाड्याने घ्यावा लागला, असे चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना उद्देशून वडेट्टीवार म्हणाले.मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.
मी ओबीसी मंत्रालयासाठी पैसा मागितला, तर आपलंच सरकार म्हणतं पैसा नाही. आपण एकत्र नसल्यामुळे ही स्थिती झाली आहे. मी विरोधी पक्ष नेता होतो, त्यामुळे मला वाटलं होतं की, महसूल सारखे महत्वाचे खाते मिळेल, पण मिळाले ओबीसी मंत्रालय. पंकजाताई तुम्हाला मिळाले ग्रामविकास, तुम्हाला तर त्यापेक्षाही मोठे खाते मिळायला पाहिजे होते. पण तसे घडले नाही. कारण ओबीसींची ताकत आपण आजवर दाखवलीच नाही. पण आता आपली ताकत दाखवण्याची वेळ आली आहे. ओबीसी खाते सांभाळताना माझ्या समाजावर अन्याय होतो आहे, म्हणून मी लढायला समोर आलो आहे आणि ही लढाई लढताना प्रसंगी मंत्रिपदही पणाला लावेन, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी काही महिने विधानसभेत विरोधी पक्षनेते व सत्ताबदलानंतर पक्षाच्या कोअर कमिटीत सहभाग, यामुळे त्यांना चांगले खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना तेवढी महत्त्वाची खाते न मिळाल्याने त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष नेतेपद भूषवल्यानंतर दुय्यम खाती पदरी पडल्याने वडेट्टीवार खट्टू असल्याची चर्चा अधूनमधून सुरु असतेच.
वडेट्टीवार यांच्याकडे खातेवाटप होताना इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन हे खाते देण्यात आले होते. खातेवाटप झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यास माध्यमांनी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी विभागातील आगामी कामाबाबत बोलण्यास अनिच्छा व्यक्त केली. सोबतच, ‘जे लिहायचे ते लिहा,’ असे म्हणत आपली नाराजी देखील व्यक्त केली होती.
दरम्यान, या नाराजीमुळेच त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील दांडी मारली होती. पुढे त्यावेळी अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाला गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आता महाविअकास आघाडीचे सरकार येवून एवढे दिवस झाले तरीही त्यांच्या मनातील ती सल अजूनही कायमच असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
