सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले हे सलग तीन वर्ष सेवेत गैरहजर होते. तरीही त्यांना तीन वर्षाचे वेतन देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आता माढा तालुक्यातील परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान कदम यांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
परितेवाडी जि. प. प्राथमिक शाळेत सहशिक्षक असताना डिसले यांना तंत्रस्नेही विशेष शिक्षक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. परंतु तेथे ते सलग तीन वर्षे गैरहजर राहिले. तसा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. त्याचवेळी तीन वर्षे गैरहजर असूनही डिसले यांचा पगार करण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम यांना नोटिस बजावून डिसले यांचा पगार कसा काढण्यात आला, अशी विचारणा केली आहे.
दरम्यान, डिसले यांनी तीन वर्षे सेवेत गैरहजर असतानाही त्या कालावधीत घेतलेला पगार त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी सोलापूर प्रदेश शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे. डिसले यांना ज्या संस्थेत प्रतिनियुक्ती देण्यात आली, त्या संस्थेत सलग तीन वर्षे ते गेलेच नाहीत. या ३६ महिन्यांत त्यांचे वेतन मात्र होत राहिले. त्यामुळे गैरहजर असतांना त्यांना वेतन का दिले गेले याची विचारणा शिक्षण विभागाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

