पुणे:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये पुण्यातील व्यापारी संघटनांनी सहभागी होण्याचं टाळलं. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार टीका केली आहे. “जेव्हा व्यापाऱ्यांवर ही वेळ येईल, तेव्हा महाविकासआघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,” असा इशारा अंकुश काकडे यांनी दिला आहे. “व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याची नोंद घ्यावी की, त्यांच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाविकास आघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यांना त्या उपकारांची जाणीव नाही,” अशी टीकाही अंकुश काकडे यांनी केली.
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेती हा शिवसेनेचा विषय नाही, त्यांना तेवढी अक्कलही नाही’
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम; भुजबळांचा प्रहार
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

