नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांचं ज्या संख्येनं आंदोलनात सहभाग दिसला आहे, ते पाहता ‘भारत बंद’ही परिणामकारक असण्याची शक्यता वर्तवली जातेय. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात ‘भारत बंद’च्या दिवशी आंदोलन होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्तरप्रदेश आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडे समर्थनाचं आवाहन केलं आहे. एकत्र येऊऩ दिल्लीच्या सीमा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ च्या दिवशी दिल्लीला जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व टोलनाक्यांवर वाहनांना अडवण्यात येईल आणि निदर्शनं होतील. शेतकरी आंदोलनांच्या नेत्यांमधील प्रमुख नेते असलेले योगेंद्र यादव यांनी केलेल्या ट्वीटनुसार दूध, भाज्या आणि फळांचा पुरवठाही बंद केला जाईल अस सांगितल आहे. भारत बंदमध्ये प्रामुख्याने रस्ते बंद केले जाणार असल्यानं अर्थातच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने होणार आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे.
या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला पाठींबा द्यायला हवा होता – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन: राजू शेट्टी वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत?
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
- देशात अराजकाचं वातावरण तयार करायचं म्हणूनच ही परिस्थिती, फडणवीसांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

