नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदला दिलेल्या समर्थनावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर जे जे पक्ष भारत बंदला पाठिंबा देत आहेत ते बहती गंगामें हात धोना या म्हणीला अनुसरुन वागत आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात हे कायदे गेल्या अनेक वर्षांपासून हे कायदे लागू आहेतच. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारचा विरोध करायचा म्हणून शेतकऱ्यांविषयीच्या कायद्यांचा निषेध केला जातो आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात एक अराजकाचं वातावरण तयार करायचं म्हणून ही परिस्थिती निर्माण केली गेली आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे.
या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सावधान ! तुम्ही गंजलेल्या पाईपांमधून आलेले पाणी पीत आहात ? संशोधकांनी केला धक्कादायक दावा…
- आधी शरद पवारांचे पत्र वाचून तर बघा- प्रफुल्ल पटेल यांचे विरोधकांना आवाहन
- कसोटी मालिकेआधी भारताला मोठा धक्का; ‘हा’ महत्वाचा खेळाडू पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार
- संसदेत तटस्थ अन् मग आता विरोध कसा ? तावडेंचा शिवसेनेला टोला
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना


