नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने चीनची सरकारी औषध उत्पादक कंपनी सिनोफार्मने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी दिली आहे. जगभरातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला असला तरी चिनी लसीची परिणामकारकता पाहता कोरोनाविरोधी लढ्यात ती कितपत यशस्वी ठरेल, याबाबत पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना शंका आहे.
बीबीआयबीपी-सीओआरव्ही असे या चिनी लसीचे शास्त्रीय नाव आहे. सिनोफार्म कंपनीने ती विकसित केलेली असल्यामुळे ती सिनोफार्म या नावानेच ओळखली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने(डब्ल्यूएचओ) आतापर्यंत फायझर, ॲस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन आणि माडर्ना या पाश्चिमात्य देशांमधील कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसींना मंजुरी दिली आहे. युरोप-अमेरिका वगळता उर्वरित जगतातील डब्ल्यूएचओने मंजूर केलेली ही पहिलीच लस आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी चिनी लसीच्या मंजुरीची घोषणा केली. आरोग्य संघटनेने मंजूर केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या यादीत आता चीनच्या सिनोफार्मचीदेखील भर पडली आहे. सुरक्षा, गुणवत्ता आणि परिणामकारकता या मापदंडावर लसीची चाचणी घेण्यात आली आहे. सिनोफार्मने सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच तिला मंजुरी देण्यात आली आहे, असे घेब्रेयेसस यांनी सांगितले. पण चिनी लस किती टक्के प्रभावी आहे आणि जगात सर्वात आधी विकसित झालेल्या लसीला मंजुरी देण्यास आरोग्य संघटनेला एवढे महिने का लागले, याचे उत्तर मात्र डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी दिले नाही.
चीनच्या सिनोफार्म आणि सिनोव्हॅक या दोन कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी तयार केल्या आहेत. सिनोफार्मने दोन लसी विकसित केल्या आहेत. याशिवाय अजून १६ लसींवर संशोधन सुरू आहे. चीनकडून जगभरातील ३० देशांना आपल्या लसी पुरवण्यात येत आहेत. पण या लसींच्या गुणवत्तेवर अनेक देशांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अलीकडेच फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींनी चिनी लसीच्या वापराबद्दल माफी मागत तिचे डोस परत पाठवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी
- आघाडीत बिघाडी? ‘काँग्रेस पक्ष विधानसभा स्वबळावर लढवणार’, नाना पटोलेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ
- कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय! रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही
- सुखद, सकारात्मक! देशात पहिल्यांदा एका दिवसात ३ लाख ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त


