मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे अकॅडमीचे विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अकादमीला 21 वर्षेही पूर्ण झाल्याबद्धल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल व ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यात किंवा देशात कुठेही गेलात तरी सर्वोत्तम काम करून आपापल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नावही मोठे करा.
आपल्या यशात मोठा वाटा असलेल्या आई, वडील आणि गुरूंना कधीही विसरू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. शासन आणि प्रशासनात सुसंवाद नसेल तर प्रश्न उभे राहतात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मला देखील प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हता, पण मुख्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडल्यावर मीही प्रशासनातल्या अनेक गोष्टी शिकलो. आम्ही रस्त्यावर उतरणारे राजकारणी आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर कोणतीही चुकीची फाईल माझ्यासमोर आली नाही पाहिजे, असे ठामपणे सांगितले होते.
आपण नशीबवान आहात कारण एका कुठल्यातरी परीक्षेला सामोरे जात असता, आपल्या मुलाखती घेणारे निवडक तज्ज्ञ असतात. आम्हा राजकारण्यांना वारंवार वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागते. आम्हाला हजारो, लाखो लोक गुण देत असतात, आमच्या मुलाखती घेत असतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी? भाजप नेते राम कदम म्हणतात…
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

