मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ मे हा शेवटचा दिवस होता. काल शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. मात्र, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यावर राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सहावा उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार आहे. आमच्या जवळ राज्यसभा उमेदवार विजयाकरिता मतदार आहेत. चौथ्या जागेसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. यावेळी महाविकास आघाडीमधला उमेदवार विजयी होणार. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असलो तरी आम्हाला आपापला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. शेवटी आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे”, असे मत काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच –
येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली. तर पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदाचे खाते हे माझ्याकडे असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं भाकित त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –


