नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहावर शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण पुन्हा मिळाल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, याबाबत यावेळी एकमत झाले. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे लोकसंख्येच्या अनुपातातील आरक्षण कायम ठेवून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण द्यावे, असा पर्यायही समोर आला. आता पुन्हा ३ सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक घेऊन अंतिम भूमिका निश्चित करण्यात येणार आहे.
मात्र, या बैठकीवर काहींनी टीका करताना वांझोटी बैठक असा उल्लेख केला. त्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी बैठक म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे आहे, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाबाबत काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला वांझोटी म्हणणं चुकीचं आहे. त्या वांझोट्या बैठकीला सर्व पक्षीय नेते होते. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असे सर्व पक्षांचे म्हणणे होते. महत्वाच्या बैठकीला वांझोटी बैठक म्हणाऱ्यांचं तोंडच वांझोटं आहे’.
दरम्यान, राज्यातील १०० नगर परिषदा व नगरपंचायतींची मुदत आधीच संपली असून, तेथे निवडणुकीची प्रतीक्षा आहे. येत्या नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २१० नगरपालिका व १० महापालिकांची मुदत संपणार आहे. मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातली आहे. मुंबईसह अन्य महापालिकांची निवडणूकही पुढे ढकलली जाईल का, की येत्या तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल करून निवडणुका घेतल्या जातील याबाबत उत्सुकता असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात – सावंत
- ‘राणे गेल्यापासून भाजप दहा फूट मागे, एक दिवस असा येईल की..’, राऊतांचा इशारा
- ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक
- ‘काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती तेव्हा…’ शेलारांची शिवसेनेवर टीका
- ‘अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काही जणांनी येड्यांच्या जत्रा केल्या,’ संजय राऊतांचा घणाघात


