🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत एनडीएची मोठी बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीसाठी आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे दिल्लीत हजर आहेत. दिल्लीतून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाचे शिंदे गट व भाजपकडून स्वागत केले जात आहे.
यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही तोंडभरून कौतुक केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देऊन देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहातून बाहेर पडल्याने भरकटला गेला आणि त्यामुळे नक्षली चळवळींना वाव मिळाला. मात्र आता देशाच्या सर्वोच्च स्थानी बसण्याचा मान एका आदिवासी महिलेला मिळणे हे निश्चितच कौतुकाची बाब आहे.” या निर्णयाद्वारे मोदींनी देशाला मोठा संदेश दिला असल्याचे यावेळी केसरकर म्हणाले.
यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, राष्ट्रपतीपदासाठीच्या एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले गेले नाही. याबाबतही मला शिवसैनिकांनी फोन करून विचारले की, ठाकरे यांना बैठकीचे निमंत्रण का दिले गेले नाही. मात्र आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आजपर्यंत राष्ट्रपतीपदाचे उमेदवारच मातोश्रीवर गेले आहेत. मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत बैठकीला गेलेला नाही आणि हीच मातोश्रीची प्रतिष्ठा आहे. असेही केसरकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
