मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला. महाराष्ट्रात कोकणासह मुंबईत या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. या वादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे तत्पर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका वसईतील एका वृद्धाश्रमाला देखील बसला आहे. यात एक वृद्ध नागरिक देखील जखमी झाल्याचं समजतंय. याच वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना शालेय शिक्षण दिलेले शिक्षकही वास्तव्यास आहेत.
‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार वसईतील न्यू लाइफ फाऊंडेशनची वास्तू ही मोडकळीस आली आहे. पुरेशी मदत नसल्याने जवळपास २५ वृद्ध अशाच परिस्थितीत येथे राहत आहेत. याच वृद्धाश्रमात ८८ वर्षीय सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या निवृत्त शिक्षिका देखील राहत आहेत. त्या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील शिक्षण दिलं आहे.
आता त्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. ‘चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालंय. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर,’ अशी विनंती वजा साद त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेले उद्धव ठाकरे आपल्या शिक्षिकेच्या मदतीसाठी कसा प्रतिसाद देणार हे महत्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंगोलीत कोविड वार्डमध्ये फिरणाऱ्या ४९ नातेवाईकांवर गुन्हा
- ‘मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ मिळावा’, आ.मेटेंची खंडपीठात याचिका
- सुबोध कुमार जयस्वाल CBI संचालक झाल्याने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार?
- धक्कादायक ; आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची रोकड, एसीबीची कारवाई
- गिरीश कुबेर यांनी हे धाडस कोणाच्या जीवावर केले याची माहिती मिळाली पाहिजे : नारायण राणे


