मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली आहे. या संबंधी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलावले होते. मात्र दुसरीकडे भाजपने या विरोधात आंदोलनाची तयारी केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती स्वतः फडणवीसांनी ट्विट करून दिली आहे.
आता फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपने बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. दरम्यान गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणात आता फडणवीसांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

