‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून मागील वर्षभरात घडलेल्या घडामोडींविषयी भाष्य केले आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’मावळते वर्ष व नवे वर्ष यात फार फरक करावा असे वातावरण नाही. २०२१ सालात महात्मा गांधींविरोधात घोषणा दिल्या, नथुराम गोडसेंचा जयजयकार धर्मसंसदेच्या नावाखाली केला. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध आला नाही. धर्मसंसदेच्या नावाखाली गांधींना शिव्या देणारे कोणी एक साधू कालिचरण हे महाराष्ट्रातले आहेत. भारतीय जनता पक्षाने या वृत्तीचा साधा निषेध केला नाही. गोडसेंनी जीनांवर गोळी चालवली नाही. पाकिस्तानची मागणी होताना मूग गिळून बसलेल्या इतर नेत्यांवर गोळी चालवली नाही.’

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना आपल्या कार्यालयांवर तिरंगा न फडकवणाऱ्या प्रवृत्तीवर गोळी चालवली नाही, पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरगळलेल्या समाजाला जिवंत करणाऱ्या गांधीजींवर गोळी चालवली. ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये आणि गांधी जयंतीस त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होण्याचे तरी ढोंग करू नये. २०१४ साठी देशाला मोदींचे नेतृत्व लाभले तेव्हा देश नव्या क्रांतीमार्गाने जाईल अशा अपेक्षेत आपण सगळेच होतो. तो सर्व विचार निरुपयोगीच ठरला. २०१४ ते २०२२ या काळात देशाला आधुनिकतेकडून पुरातन, बुरसटलेल्या काळात नेण्याचेच प्रयत्न झाले. विकृत, धर्मांध विचारांचा जीर्णोद्धार व लोकांच्या बुद्धीवर गंज चढविण्याचे प्रकार झाले, असे राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या