‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून २०२१ साल सरले, पण २०२२ या वर्षात आशेची किरणे दिसतील काय?, असा सवाल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव देखील केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’२०२१ अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न २०२२ च्या झोळीत टाकून २०२१ सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. २०२० मावळताना २०२१ वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. २०२१ ने २०२२ ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे.’

दरम्यान, ‘२०१४ साली देशाला मोदींचे नेतृत्व लाभले तेव्हा देश नव्या क्रांतीमार्गाने जाईल अशा अपेक्षेत आपण सगळेच होतो. तो सर्व विचार निरुपयोगीच ठरला. २०१४ ते २०२२ या काळात देशाला आधुनिकतेकडून पुरातन, बुरसटलेल्या काळात नेण्याचेच प्रयत्न झाले. विकृत, धर्मांध विचारांचा जीर्णोद्धार व लोकांच्या बुद्धीवर गंज चढविण्याचे प्रकार झाले.’ तसेच मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या