…त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत

मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी १२ कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली. यावरून मोदी सरकारवर टीका झाल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. २८ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाडय़ा वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची १२ कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे.

दरम्यान, पुढे राऊत म्हणाले की,’२०२० मध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन २०२१ च्या अखेरीस संपले, पण ७०० हून जास्त शेतकऱ्यांना त्यासाठी प्राण गमवावे लागले. शेतकरी आंदोलनातील काही संघटना आता पंजाब-हरयाणातील विधानसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. शेवटी प्रत्येकाला राजकारणात उतरायचेच आहे व सत्तेवर विराजमान व्हायचे आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला आता असे वाटू लागले की, त्यांचा पक्ष सत्तेवरून कधीच खाली उतरणार नाही. तो भ्रम आहे. प. बंगालात भाजपचा दारुण पराभव झाला. नरेंद्र मोदी यांचा चेहरा व अमित शहा यांची दबंग चाणक्य नीती सर्वत्र चालतेच असे नाही हे प. बंगालने सिद्ध केले.’

महत्वाच्या बातम्या