‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी १२ कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली. यावरून मोदी सरकारवर टीका झाल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असा खोचक टोला लगावला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते राम सातपुते(Ram Satpute) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

या संदर्भात राम सातपुते यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा मुंबई च्या गटारात केलेल्या भ्रष्टाचारावर शोध पत्रकारिता करा’, असा सल्ला सातपुतेंनी राऊतांना दिला आहे.

दरम्यान, लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. २८ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाडय़ा वापरतात.’

महत्वाच्या बातम्या