‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’, संजय राऊतांचा सवाल

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून निवडणुकींसंदर्भात भाष्य केले आहे. तसेच यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?, असा सवालही राऊत यांनी केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’नव्या वर्षात नवे काय होईल? हे कोणीच सांगू शकत नाही. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आणि मुंबईसह महाराष्ट्रात ९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल आणि ‘हे सारे कशासाठी? यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’ असा चेहरा करून सामान्य माणूस महागाईचे ओझे खांद्यावर घेऊन आपली वाटचाल कशीबशी चालू ठेवील. राजकारण्यांवरील उरलासुरला विश्वासही २०२१ सालाने नष्ट केला. कुणाचीही बाजू घेणे अशक्य व्हावे या स्थितीला नेते मंडळी गेली आहेत. केंद्र सरकारने लोकांवर रात्रीचे निर्बंध लावले त्यामुळे उद्योग, व्यवसाय, हॉटेल व्यावसायिकांचे धंदे मंदावले.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतल्यानंतर हे निर्बंध लावले, पण उत्तर प्रदेशात स्वतः मोदी, अमित शहा हे सत्ताधारी, प्रियंका गांधी, केजरीवाल, अखिलेश यादव हे विरोधक रोज लाखालाखांच्या सभा घेतात. त्यामुळे निर्बंध फक्त सामान्य लोकांसाठी, नेते मंडळी मोकाट आहेत. यावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोजक्या शब्दांत लोकांचा संताप व्यक्त केला. ‘रात्री कर्फ्यू आणि सकाळी लाखोंची गर्दी बोलवायची हे कुठले निर्बंध?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदी हे उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रोनबाबत चिंता व्यक्त करतात याला निर्बंध कसे म्हणायचे? निर्बंधामुळे लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला आहे. नवे वर्ष साजरे झाले नाही, पण त्यामुळे लाखो हॉटेल्स, कॅटरिंग, इव्हेन्टस्वाले, दुकानवाले, मंडपवाले, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे उत्पन्न बुडाले, त्यावर सरकारकडे काय उपाययोजना आहे? २०२१ सालातही ती नव्हती व २०२२ सालातही नसेल.’

महत्वाच्या बातम्या