मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राणे रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राणे यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नाशिक, पुणे, महाड इथे राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाशिक तसेच पुणे पोलिसांची पथके त्यांना अटक करण्यासाठी रवाना करण्यात आली होती.
दरम्यान, भाजपची भूमिका स्पष्ट करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ”केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही. देशाच्या शिष्टाचाराच्या दृष्टीने विचार केल्यास केंद्रीय मंत्री हे ‘७ अ’ या गटात मोडतात. त्यांना अशाप्रकारे कुठलंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. नारायण राणेंना अटकचे आदेश केवळ सत्तेचा दुरुपयोग करून काढले आहेत. या सरकारला कोण सल्लागार मिळतात माहिती नाही. सर्व प्रकरणात न्यायालयात दणका मिळाला, अगदी त्याचप्रमाणे या प्रकरणात देखील न्यायालयात दणका मिळेल.”
दरम्यान, महाराष्ट्रात अशा पद्धतीने एका केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अनेक नेत्यांना विविध कारणांसाठी अटक करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत मात्र अशा पद्धतीने एका केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अटकेचे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पडसाद पडताना पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेना आक्रमक! कोंबड्या सोडत नारायण राणेंच्या पोस्टरला मारले जोडे
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले


