उस्मानाबाद : अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आहे.जिल्ह्यात केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांवर नुकसान झाल्याचे समोर आले असताना अग्रीम टाळण्यासाठी विमा कंपन्यांकडून ३० टक्केच नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून, या प्रतिनिधींना कृषी क्षेत्रातील अभ्यास नसल्याचा दावा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामध्ये २२ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील तफावत विचारात घेऊन अग्रीम रक्कम देण्याची व्यवस्था आहे. पावसातील खंडामुळे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अनुज्ञेय २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या अनुषंगाने आदेश निर्गमित केले होते.
आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कृषी विभागाने चाचणी प्रयोग केले व ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढला. २० ऑगस्ट रोजी अहवाल देणे अपेक्षित असताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून अहवालावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला. ही गंभीर बाब कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या निदर्शनास आणून कार्यवाहीची मागणी केल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ३० टक्केच नुकसान झाल्याचे लेखी दिल्याचे समजते. नमुना सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या विमा कंपनी प्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घेतली असता ७० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिनिधींचा कृषी अभ्यासक्रमाशी कुठलाही संबंध नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
कृषी विभागाच्या अनुभवी अधिकाऱ्यांपेक्षा हे प्रतिनिधींनी या क्षेत्रात तज्ञ आहेत का, अग्रीम नुकसान भरपाई तातडीने मिळावी ही बाधित चिंताग्रस्त शेतकऱ्यांची मागणी असताना महाविकास आघाडी सरकार विमा कंपनीला सूट का देत आहे, खरीप २०२० चा हक्काचा पीकविमा देखील अशा वर्तनामुळेच प्रलंबित आहे. दरम्यान,शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अग्रीम मिळण्यासाठी तसेच विमा मिळण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देशाच्या संपत्तीची विक्री, आमदारांची खरेदी, इतकंच अर्थशास्त्र भाजपला कळतं’; राऊतांचा हल्लाबोल
- ‘सरकार मालमत्ता विक्रीत व्यस्त, तुम्हीच तुमची काळजी घ्या’, राहुल गांधींचे देशवासियांना आवाहन
- जयसिंगपुऱ्यात ड्रेनेजचे पाट पाहून आमदार प्रणिती शिंदे संतापल्या, ‘हा काय प्रकार आहे’?
- लाल चिखल! राज्य सरकारने सर्कस बनून शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये-सदाभाऊ खोत
- अफगाणिस्तानातील नव्या सत्तेबाबत भारत ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत


