औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून ओसरली आहे. रुग्णांची संख्या घटल्याने महापालिकेने फक्त तीन कोविड केअर सेंटर्स सुरु ठेवली आहेत. इतर सेंटर बंद केली आहेत. मात्र दुसरीकडे जैविक कचऱ्याचा आकडा कमी झालेला नाही. महापालिकेने यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीला दररोज सुमारे तेराशे किलो कचऱ्याचे पैसे मोजत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराकडे संशयाने पाहिले जात असून महापालिका याविरोधात काय पाऊले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर कोविड केअर सेंटर मधून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम नाशिक येथील वॉटर ग्रेस या कंपनीला दिले आहे. त्यासाठी प्रति किलोला शंभर रुपये आणि वाहतुकीसाठी एका कोविड सेंटर साठी ५०० रुपये असा मोबदला दिला जात आहे. त्यानुसार कंपनीचे काम सुरू आहे. कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताच जैविक कचऱ्याचे संकलन वाढले. मात्र रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर जैविक कचऱ्यात घट झालेली नसल्यामुळे कंपनीच्या कामाविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
त्यावेळी सरासरी दोन हजार किलो जैविक कचरा निघत असल्याचे समजते. सध्या १३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तरीही रोज बाराशे ते तेराशे कचरा निघत असल्याच्या नोंदी होत आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकाराकडे संशयाने पाहिले जात आहे. शहरातील इतर रुग्णालयांचा कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम देखील वॉटरग्रेस कंपनीकडेच आहे.
त्याबाबत महापालिकेने कोरोना काळातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी या कंपनीला वेगवेगळे बिले देण्यास सुरुवात केली. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर केला होता. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ५० लाख रुपयांचे बिल मंजूर केले आहे. यात मार्च २०२१ पर्यंत ७५ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फेव्हिकॉलची धडाकेबाज पोस्ट पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
- कॉटन बेल्सचा २३ लाखांचा माल घेऊन ट्रक चालक पसार, दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल
- ‘मालमत्ता करवाढ म्हणजे मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार’ ; भाजपचे टीकास्त्र
- …तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
- ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन, पंकजा मुंडेंची घोषणा


