🕒 1 min read
नागपूर : राज्य शासन असो वा जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राथमिकता सामान्य माणसाच्या जीवाची काळजी घेणे आहे. कोरोना काळात याच सूत्राने लॉकडाऊन व निर्बंधासंदर्भात निर्णय घेण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत सुरु राहील ही काळजी घेऊनच यापुढेही धोरणांची आखणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली.
स्थानिक हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये आयोजित या चर्चासत्रात तीन तास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात विचारमंथन झाले. गेल्या दीड वर्षांमध्ये या साथ रोगामुळे व्यापार-उद्योग, निर्मिती क्षेत्रातील उद्योग समूहांवर आर्थिक संकट आले असून जिल्ह्यातील उद्योग अतिशय वाईट स्थितीतून जात असल्याचे विविध मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्पष्ट केले. यावर उत्तर देताना पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या सर्व परिस्थितीची जाणीव राज्य शासनाला आहे.
जिल्हा प्रशासनालाही याची जाणीव आहे. त्यामुळेच यापूर्वी झालेले सर्व निर्णय विविध घटकांशी समन्वय साधून घेतले गेले आहे, राज्य शासन देखील या साथ रोगाशी लढतांना केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करते. त्यामुळे देशभर स्थिती अशीच आहे. तथापि, नागपूर तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही. औषधांचा तुटवडा भासणार नाही. तसेच रुग्णांचे वहन करताना अडचणी येणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विदर्भामध्ये ऊर्जा विभागामार्फत 200 ॲम्बुलन्सचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या पूरक व्यवस्थेसाठी ऊर्जा विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. ऑक्सिजन संदर्भात सर्वपक्षीय मदत झाली आहे. तिसऱ्या लाटेसाठी मेडिकल, मेयो, एम्स,येथे पीएससी प्लांट उभारणे अंतिम टप्प्यात आहे. पीएम केअर मधून मेडिकलमध्ये आणि कामठीमध्ये प्लांट उभारणे प्रगतीपथावर आहे. नागपूरने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक बेडची व्यवस्था केली आहे. सध्या 3 हजार 226 बेड उपलब्ध आहेत. कॉल सेंटर सुरू करण्यात आले. मनपा क्षेत्रात ५६ तर ग्रामीण भागात 116 अशा एकूण 172 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. डेडबॉडी व्यवस्थापन करण्यात आले आहे. शववाहिका देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्याने घेतलेल्या आघाडीबाबतही अवगत केले. नागपूर शहरात 19 सप्टेंबर पर्यंत 19 लक्ष 11 हजार लोकांचे लसीकरण झाले आहेत. तर नागपूर ग्रामीण भागात 14 लक्ष 46 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण हे मुख्य कवच असून व्यापारी उद्योजकांनी याबाबतीत ग्राहकांशी संवाद साधावा, कोविड प्रोटोकॉल पाडण्यासाठी आवाहन करावे, असे त्यांनी सांगितले. उद्या मंगळवारी जिल्ह्यामध्ये फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोविड तिसऱ्या लाटेच्या समर्थपणे सामना करण्यासाठी टीम वर्कची गरज आहे. उद्योग-व्यापार दुकाने सुरू राहावी. आपल्या जिल्ह्याची अर्थसत्ता अधिक मजबूत व्हावी. जिल्ह्याची प्रगती व्हावी. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा. आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहून कोविड नियंत्रणात राहावा. ही आमची इच्छा आहे. यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्व व्यापारी समुदाय यांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी आपल्या निवेदनात केले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी प्रशासन पालकाच्या भूमिकेत असते. प्रशासनाची नजर पूर्ण वर्तुळाची असते. त्यामुळे व्यापार उद्योग समूहाने निश्चिंत असावे. प्रशासनाला सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासनाने आखलेल्या आराखड्यानुसार अंमलबजावणी पोलीस प्रशासन करते. अगदी शेवटचा उपाय म्हणून सक्तीने कायदा वापरला जातो. आमचे देखील 24 जवान या लढ्यात शहीद झाले आहे. त्यामुळे हा विषय थेट जिवित्वासी जोडल्या गेल्यामुळे संवेदनशीलतेने समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एका बहुरूपी विषाणूशी हा लढा असून डेल्टा व्हेरीएंटच्या वर्तणापासून सामान्य नागरिकांच्या प्राथमिक गरजांना अडथळा निर्माण होणार नाही असा मोठा परिवेष प्रशासनाचा आहे. त्यामुळे कोरोना साथ रोगाची व्याप्ती लक्षात घेऊन व्यापारी समुदाय यांनी प्रशासनाला मदत करावी, महानगर वैद्यकीयदृष्ट्या तिसऱ्या लाटेला समर्थपणे सामना करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेंना आणखी एक धक्का ? ‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द अखेर पाळला’ – विनायक राऊत
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात होणार प्रत्यक्ष महत्वाची बैठक; व्हाईट हाऊसने दिली माहिती
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- पुणेकरांना आज मोठा दिलासा : नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
