पुणे : कालच साधेपणाने गणोशोत्सवाची सांगता झाली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने यंदा सर्व सण-उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्व प्रशासनांनी केले होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचे वातावरण होते. पुणे शहरात विविध बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांसह पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली जात होती.
दरम्यान, गणेशोत्सव काळात वा उत्सव संपल्यानंतर आतापर्यंत तरी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद नसून उलट पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या लाटेनंतर आज पहिल्यांदाच कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या घसरणीची नोंद झाली असून केवळ ८६ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये देखील घट होत असून रुग्ण संख्या अशीच कमी होत राहिल्यास व जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास पुणे कोरोनामुक्त होण्यास अधिक गती येईल.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज नव्याने ८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९९ हजार ४५९ इतकी झाली आहे. तर, शहरातील २३७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८८ हजार ८८४ झाली आहे.
यासोबतच, शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ०११ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३२ लाख ९१ हजार ५६७ इतकी झाली आहे. सध्या शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार ५७१ रुग्णांपैकी १७३ रुग्ण गंभीर तर २८० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, महापालिका हद्दीत नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ९ हजार ००४ इतकी झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम एका दिवसाने वाढला, जामीन अर्जावर उद्या निकाल
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात होणार प्रत्यक्ष महत्वाची बैठक; व्हाईट हाऊसने दिली माहिती
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचची प्रवेश प्रक्रिया होणार सुरु


