पुणे : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठा वाद सुरु आहे. दररोज नवनविन खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणावरुन भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.
केंद्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागत आहे, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. केंद्राने कितीही त्रास देऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि जे त्रास देत आहेत, त्यांना आम्ही पुरून उरणार, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकार बऱ्याच मुद्द्यावर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या राज्यात गाजत असलेले आर्यन खान आणि समीर वानखेडेप्रकरणीही राज्यात मोठा गोंधळ दिसत आहे. ‘सध्या राज्यात मराठा, धनगर आणि अल्पसंख्याक समाजांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. या समाजांच्या मागणीला राज्य सरकारमधील प्रत्येक पक्षाचा पाठींबा आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजप मुद्दामपणे राज्य सरकारला या मुद्द्यांवरून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही दिलीप वळसे-पाटलांनी केला आहे.
येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा आपल्यातील काही नाराजांचीच भीती आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला मतदान झालं तसंच मतदान आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालं पाहिजे. निर्वाचित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील जनतेसाठी लोकोपयोगी कामं केली पाहिजेत, अशी अपेक्षाही वळसे पाटीलांंनी यावेळी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- माझ्या वडिलांचे नाव दाऊद नाही तर ज्ञानेश्वर; समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील


