टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची लोकसभा निवडणुकीपासून वाढलेली जवळीकता ही या युतीची द्योतक असल्याचं सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि मनसे हे पक्ष जवळ आल्याचं दिसत आहे. तर आज नाशिक येथे संवाद दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चक्क कौतुक केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्षाची पडझड झाली तरी हेडलाइन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पक्ष असतात. राज्यात सगळीकडे पक्षबदलाचं वारं वाहू लागलं आहे. आमच्याकडे सत्ता असो वा नसो मात्र प्रत्येक टीव्ही चॅनेलच्या हेडलाइन्समध्ये दोनच पक्ष चर्चेत आहेत. तसेच ज्यांच्याकडे एकही आमदार नाही खासदार नाही असे राज ठाकरे टीव्हीवर दररोज झळकतात. सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणात बोलल्यामुळे त्यांना ईडीची नोटीस आली. त्यांच्यावर नेहमी आरोप होतो की मनसेकडे एकही आमदार नाही, खासदार नाही. पण तरी देखील राज ठाकरे हे खणखणीत नाण आहे. त्यामुळे ईडीची नोटीस आल्यापासून 72 तास टीव्हीवर फक्त राज ठाकरे दिसत होते.
दरम्यान राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या संवाद दौरा काढला आहे. पहिल्या टप्प्यात सुळे सहा जिल्ह्यात जाणार आहेत. या दौऱ्यात त्या राज्यातील पूर परिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ कारभार याचा आढावा घेत आहेत.
- सत्तेत असताना जनतेशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती : मुख्यमंत्री
- भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे
- भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…
- दिपाली सय्यद यांनी पुण्यातून विधानसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

