औरंगाबाद : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहेत. रविवारी सुरू झालेला संप सोमवारी (दि.८) दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्यांची आणि अगोदरच गावी गेलेल्यांना परतण्याची मोठी पंचाईत झाली आहे. मात्र यामध्ये खाजगी एजंट आणि दलालांचा मोठा सुळसुळाट झाला असून याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या संपाचा थेट परिणाम स्मार्ट सिटी बसवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद विभागातील सिडको, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, सोयगाव या आगारांतील कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.७) सकाळपासून काम बंद आंदोलन केले होते. दुपारी २ वाजेनंतर मध्यवर्ती बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनीही काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवत गाड्या आगारातच उभ्या केल्या. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.८) कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या दरम्यान बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. अवाच्या सव्वा दराने भाडे देऊन प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असून यात खाजगी दलालांचा फायदा होत आहे. अनेक जण आहेत त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. सुट्ट्या संपल्याने कामावर हजर होण्याची सूचना मिळूनही अनेकांचा नाईलाज होत आहे.
४५ स्मार्ट बसच्या ५०० फेऱ्या रद्द
शहर बस सेवेत महामंडळाचे चालक आणि वाहक कार्यरत असल्याने एसटी महामंडळाच्या संपाचा थेट परिणाम स्मार्ट सिटी बस वर झाला आहे. दररोजच्या प्रवासात स्मार्ट सिटी बसचा औरंगाबादकरांना मोठा आधार आहे. शहरातील विविध मार्गांवर ४५ स्मार्ट सिटी बसच्या दररोज एकूण ५०० फेऱ्या होतात. मात्र रविवार पासून एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे शहर बसही बंद आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही. तोपर्यंत शहर बसही सुरू होणार नसल्याची माहिती स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाद्वारे देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे- देवेंद्र फडणवीस
- एसटी संप; ‘कोर्ट जे आदेश देईल त्याचे पालन करणार’, अनिल परबांची माहिती
- ‘दिल और तिल.’म्हणत भूमीने शेअर केलेल्या फोटोने वेधले लक्ष
- ‘विरोधकांचं वागणं अत्यंत द्वेषपूर्ण’, पंतप्रधान मोदींचा आरोप
- ‘सध्याची अवस्था म्हणजे मंत्री तुपाशी अन् कर्मचारी उपाशी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

