परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था मतदारसंघाअंतर्गत मातब्बर उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह मतदारांना थेट सहलीवर पाठवले आहे. दरम्यान २१ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या सहलीतून किती मतदारांची पळवापळव होते हे बघणे महत्वाचे असणार आहे.
जिल्हा बँकेअंतर्गत २१ पैकी १५ संचालकांच्या जागांकरिता 21 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच वेगवेगळ्या मतदारसंघामधील दिग्गज नेत्यांसह उमेदवारांनी सर्व खबरदारी म्हणून स्वतःच्या समर्थकांसह मतदारांनासुद्धा थेट सहलीवर रवाना केले आहे. विशेष करुन सोनपेठ सहकारी संस्था मतदारसंघाअंतर्गत लोकसभा निवडणूक लढवलेले राजेश विटेकर विरूद्ध गंगाधर बोर्डीकर यांच्यातील अटीतटीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी त्यांचे मतदार अर्ज दाखल केल्याबरोबर अज्ञात स्थळी पाठवून दिले आहे. सोनपेठमध्ये एकूण ५५ मतदार आहेत.
त्यात एकेक मत देखील निर्णायक असणार आहे. त्यामुळे आपापल्या मतपेढीस ( वोट बँक) धक्का लागू नये व प्रतिस्पर्ध्यांच्या वोट बँकेतून मतदान खेचण्याकरिता अर्थपुर्ण लढाई देखील सुरू आहे. दरम्यान सोनपेठच्या घडामोडींवर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोनपेठप्रमाणे सेलूमध्ये देखील आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्यांचे मतदार सहलीवर पाठवले आहेत. या मध्ये सेलूमध्ये एकूण ७२ मतदार आहेत. विरुद्ध असणाऱ्या वर्षा लहाने या रिंगणातून माघार घेतील, असा अंदाज होता. पण लहाने यांचा अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळेच दगा फटका होवू नये म्हणून आमदार बोर्डीकर गटाने मतदारांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. या दोन मतदारसंघानुसार पालम, हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ व कळमनुरी येथील काही मतदार देखील सहलीवर गेले आहेत.
औंढ्यातून राजेश पाटील गोरेगावकर, कळमनुरीत माजी खासदार शिवाजी माने व सुरेश वडगावकर यांनी काही मतदारांना अज्ञातस्थळी पाठवून दिले आहे. या तुलनेत परभणी, वसमत व सेनगाव या सोसायटी मतदारसंघाअंतर्गत मतदारांबरोबर मातब्बर उमेदवार, नेते संपर्क ठेवून आहेत. परभणी 272, वसमत 144 तर सेनगावातून 101 मतदार आहेत. ज्येष्ठ नेते माजीमंत्री आमदार सुरेश वरपुडकर हे परभणीतून बिनविरोध निवडून येतील, असा अंदाज होता, पण माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर समर्थक दत्ता गोंधळकर यांचा अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे आमदार वरपूडकर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता कमी दिसते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात पण… , वाझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांचं ट्विट
- ‘समांतर’ भाग दोन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…
- पायाच्या दुखापतीनंतर ममता आज पुन्हा निवडणूक रणांगनावर
- गतवर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर धोनीने घेतला संन्यास? भिक्खूच्या अवतारातला फोटो व्हायरल
- चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच, वाझेंच्या अटकेनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया


