🕒 1 min read
Chhagan Bhujbal । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंड करत महाविकास आघाडीतून बाहेर पडले. यावेळी शिंदे यांना ४० आमदारांचे समर्थन होते. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत जात राज्यात युतीच सरकार अस्तित्वात आणलं. त्यानंतर रविवारी शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र काल झालेल्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला जुनीचं खाती आली. तर, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनकडे असणारी काही खाती देखील भाजपकडे गेली आहेत. त्यामुळं शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या मंत्र्यांच्या हाती काय लागलं हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. यावरून आता शिवसेना मुखपत्र सामनातून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात ?
जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे? महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत मऱ्हाटी जनता आहे. ‘ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते.
यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. 38 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल. नगर विकासचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपळाच दिला आहे. सगळी प्रमुख खाती श्री. फडणवीस व त्यांच्याच लोकांच्या मुठीत. त्यामुळे नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावे लागेल, पण खोक्यांखाली स्वाभिमान चिरडून गेला असल्याने हे सर्व ते सहन करतील!
शिंदे म्हणून जो काही एक गट निर्माण झाला त्यातील काही लोकांना मंत्रीपदे मिळाली. यावर उरलेल्यांनी लगेच नाराजी व्यक्त करून मंत्रीपदाच्या इच्छा जाहीर केल्या. शिंदे गटाचे संभाजीनगरचे आमदार शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ‘‘मला कॅबिनेट मंत्रीपद आणि संभाजीनगरचे पालक मंत्रीपद हवे म्हणजे हवेच!’’ काल-परवा आलेल्या टोपी फिरवू दीपक केसरकरांना मंत्रीपद मिळते, मग आम्हाला का नाही? असे शिरसाट म्हणतात. यावर केसरकर ‘हपापाचा माल वाटपा’चे मालक असल्यासारखे आश्वासन देतात, ‘‘शिरसाटांनाही पुढच्या विस्तारात नक्कीच मंत्रीपद मिळेल!’’
केसरकर, सामंत यांच्यासारखे अनेक राजकीय बाहेरख्याली कधी इथे तर कधी तिथे व कुठेच जमले नाही तर शिंदे गटाच्या गुळास जाऊन चिकटत असतात. त्यामुळे शिरसाट-गोगावले अशा गट निष्ठावंतांचे वांधेच झाले म्हणायचे. शिरसाट या भानगडीत इतके बावचळले की, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर उद्धव ठाकरे हेच कुटुंबप्रमुख असल्याचे जाहीर केले व नंतर सारवासारव करीत हा आमचा टेक्निकल लोचा असल्याचे सांगितले. मात्र शिरसाट यांनी शिंदे यांच्या गटातील 50 जणांची ‘खदखद’च एकप्रकारे व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal । तुम्हीच सत्तेसाठी आला नव्हता, तर मग आता रडता कशाला?; भुजबळांचा शिंदे गटावर निशाणा
- Chandrashekhar Bawankule | विनायक मेटेंचा घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे
- Abdul Sattar | भाजपने ८० टक्के खाते स्वत:कडे ठेवली? अब्दुल सत्तार म्हणाले…
- Jitendra Awhad | “गळा घोटण्याचा प्रकार करु नका” ; सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांची टीका
- Independence Day | ऐका ढोल ताशावर वाजणारे इन्ट्रुमेंटल राष्ट्रगीत; अमृत महोत्सवानिमित्त अनोखी संकल्पना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
