मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसने अधिक आक्रमक रूप धारण करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या हाती सोपवली.
महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे नाना पटोले यांच्याकडे गेल्यापासून त्यांनी देखील अधिक आक्रमक रूप घेतले आहे. काँग्रेस आमदारांना-मंत्र्यांना कामासाठी मिळणारा निधी यावरून उघड नाराजी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाराजी यासह येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा यामुळे महाविकास आघाडीतील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं दिसून येत आहे.
अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पुण्यात बोलताना उघड नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यासोबतच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप देखील पटोले यांनी केला होता. यानंतर, अजित पवार यांनी त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाना पटोलेंसारख्या लहान व्यक्तींवर बोलण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं.
यानंतर, महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढण्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये देखील दुफळी निर्माण होत असल्याचं बोललं जात होतं. या वादावर वेळीच पडदा टाकण्यासाठी मंगळवारी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली होती. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे पवारांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मात्र उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
यावर नाना पटोले यांनी काल (बुधवारी) माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘ही बैठक राज्य सरकार आणि त्यातील समन्वयाबाबत होती. ही बैठक पक्षस्तरीय नव्हती. ते (शरद पवार) महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत,’ असं विधान पटोलेंनी केलं होतं. त्यामुळे पवारांनी नाराजी वर्तवल्यानंतर पटोलेंनी वाद मिटवण्यासाठी या पहिलं पाऊल उचलल्याचं दिसून येतंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार’, बबनराव लोणीकर यांची टीका
- एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ
- डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- योगींच्या राज्यात कावड यात्रेला परवानगी; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

