🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादसह उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद चे नाव धाराशिव असे करण्याच्या प्रस्तावास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या नामांतराच्या निर्णयाला मंत्रिमंडळात जरी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व नाराज असल्याची चर्चा सुरू होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नामांतराचा विषय हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. याबाबत आम्हाला क्वचितही माहिती नव्हती. असे शरद पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमचा किमान समान कार्यक्रम कार्यक्रम जो ठरला होता. त्याचा नामांतर हा भाग नव्हता. या नामांतराच्या निर्णयासाठी आमची सर्वांची सामूहिक संमती नव्हती. मात्र मंत्रिमंडळाच्या कामाच्या पद्धतीत एक नियम असतो. मंत्रिमंडळाच्या कामकाजात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तोच सर्वतोपरी असतो. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर फक्त आपापले मत व्यक्त केले जाते. त्यामुळे त्याच पद्धतीने मंत्रिमंडळात हा नामांतराचा निर्णय घेण्यात आला. हा नामांतराचा विषय किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. त्यांनी या निर्णयाव्यतिरिक्त औरंगाबादच्या इतर महत्त्वाच्या निर्णयावर लक्ष दिले असते तर जनतेला आनंद झाला असता, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा विषय वारंवार चर्चेत राहिला होता. एका गटाचे म्हणणे होते की औरंगाबादचे नामांतर व्हावे तर दुसऱ्या गटाकडून या नामांतरास विरोध केला जात होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या वाटेवर होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी शेवटची मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या बैठकीत औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेक स्तरातून उद्धव ठाकरे यांचे कौतुकही करण्यात आले. तसेच या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोधीही झालेला पाहायला मिळाला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
