मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.
या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.
तर दुसऱ्या बाजूला शिवसेना अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही अल्याची माहिती आहे. परमबीर सिंह यांना जो न्याय लावण्यात आला तोच अनिल देशमुख यांना लावण्यात यावा. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.
आता आज ( १५ मार्च ) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे कारण जरी मंत्र्यांची झाडाझडती असल्याचे सांगण्यात येत असले तरी सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे पाय खोलात अडकल्याने या प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते. तर परमबीर सिंह यांचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेवर दबाव वाढवण्याची रणनीती देखील या बैठकीत थाणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टने वाढदिवशी दिले सरप्राईज, ‘आरआरआर’ मधील फर्स्ट लूक रिलीज
- मंत्रालयाच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या; 2 शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड काम!
- राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत बुरख्यावर बंदी,एक हजाराहून अधिक मदरसेही होणार बंद
- इशानच्या उत्तम कामगिरीमुळे सिनिअर खेळाडूची जागा धोक्यात?
- भाचा कृष्णा अभिषेकच्या वादावर गोविंदाचे मोठे भाष्य


