बीड: अपघात झालेल्या कारचे टायर तसेच कारमधील इतर साहित्य चोरांनी चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मांजरसूंबा-पाटोदा या राष्ट्रीय मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारस घडली. या प्रकणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अत्यंत लाजिरवाणी आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अपघात झालेल्या गाड्या तरी सोडा रे… असं म्हणायची वेळ आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास लिंबागणेश शिवारात राजयोग ढाबा परिसरात लातूरहून पुण्याकडे जाणारी कार (एम एच १४, एच के ३६२६) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याखाली जाऊन पलटली. लातूर जिल्ह्यातील पोहरेगाव येथील रोहित शिंदे हे आई वडिल व बहिण यांच्यासह पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने कारमधील प्रवाशांना मोठी इजा अथवा जीवीत हानी झाली नाही. सर्वांना किरकोळ स्वरुपाची इजा झाली. अपघाताची माहिती मिळताच जवळच्या परिसरातील नागरिक, सरपंच बाळासाहेब मुळे व इतर ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना कारबाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातानंतर कार अपघातस्थळीच पलटी झालेल्या अवस्थेत रात्रभर होती. सर्वजण रुग्णालयात होते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी या कारचे चारही टायर, स्टेपनी व कारमधील साऊंड सिस्टीम चोरुन नेली. कारमधील साऊंड सिस्टीम काढण्यासाठी दगडाने कारच्या काचा फोडल्या गेल्या. गुरुवारी सकाळी प्रदीप शिंदे हे कार दुरुस्तीसाठी घेऊन जायला आले तेंव्हा कारचे टायर, स्टेपनी व इतर साहित्य चोरी गेल्याचे समोर आले.
यानंतर त्यांनी नेकनूर पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिक प्रयत्न करत असताना दुसरीकडे संवेदनशिलता दाखवण्याऐवजी अपघातग्रस्त वाहनांमधील साहित्य चोरण्याचा प्रकार हा माणुसकीला लाजवणारा आहे. नेकनूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी लिंबागणेश पोलिस चौकी जमादार राऊत संतोष यांच्यासह घटनास्थळी स्थळपंचनामा केला तसेच आता पुढील तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या अभिनयाला ऑस्कर्स पुरस्कार द्या’ ; राम गोपाल वर्मा यांचे ट्विट चर्चेत
- भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! विलगीकरण कालावधीत होणार घट
- बीडमध्ये मान्सूनपूर्व आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम
- तुमचे अश्रू म्हणजे फक्त एक इव्हेंट; मोदीजी, ‘त्या’ जनतेचे अश्रू आठवा – चाकणकर
- निष्काळजीपणा शिगेला! ऑक्सिजन बंद पडलं, सांगून सुद्धा दुर्लक्ष


