मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचा ज्वर चढू लागला आहे. माणसे इकडून तिकडे उडय़ा मारू लागली की, राजकीय पारा चढला असे समजायला हरकत नाही. उत्तर प्रदेशात योगी मंत्रिमंडळातील तीन प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा दिला. स्वामीप्रसाद मौर्य, दारासिंग चौहान आणि श्रीमान सैनी या तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला व अखिलेश यादव यांच्या भेटीस ते गेले. भाजपच्या इतर सहा आमदारांनीही राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे हे लोण वाढतच जाईल. आणखी काही मंत्री राजीनामा देतील असे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच ओपिनियन पोल आले. उत्तर प्रदेशात भाजपास चांगले बहुमत मिळेल असे या ‘पोल’मध्ये दाखविण्यात आले. तरीही तीन मंत्री व सहा आमदारांनी भाजपास सोडचिठ्ठी द्यावी याचा काय अर्थ घ्यावा? ओपिनियन पोल काहीही म्हणत असले तरी जमिनीवरील चित्र वेगळे आहे.
पुढे ते म्हणाले की,’भाजपच्या मंत्र्यांनाच जिंकण्याची आशा वाटत नाही. त्यामुळे बुडवणाऱ्या बोटीतून लोक पटापट उडय़ा मारून नवा आधार शोधत आहेत. गोव्यातही भाजपचे एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षत्याग केला. मयेचे आमदार प्रवीण झांटय़े यांनीही भाजप सोडला आहे. गोव्यात भाजपला आणखी बरीच भगदाडे पडतील. महाराष्ट्रातून गेलेले ‘पेपर सिमेंट’ ही भगदाडे रोखू शकणार नाहीत. कारण गोव्यातील भाजपचे सरकार हे आयाराम-गयारामांच्या कुबड्यांवर निर्माण झाले. जनमताचा कौल भाजपास नव्हता, पण त्यांनी जनमत विकत घेतले व सरकार स्थापन केले हे समजून घेतले पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.’
प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात वातावरणनिर्मिती करीत आहेत. त्यांच्या सभांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय, पण काँग्रेसला सोबत घेऊन जागा वाया घालविण्यापेक्षा आपल्या ताकदीने लढावे असा इतर विरोधी पक्षांचा विचार झालेला दिसतो. आज तरी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यात ‘कांटे की टक्कर’ स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाचा रस्ता मोकळा नाही. पोलीस यंत्रणेचा अतिरेकी वापर नक्कीच केला जाईल. निवडणुका जिंकण्याचे तेच एकमेव हत्यार भाजपच्या हाती आहे. पैसाअडका, गाडीघोडे, सोशल मीडिया या संसाधनांत भाजपशी स्पर्धा करणे कोणालाच जमणार नाही. विरोधकांची आर्थिक तसेच इतर मार्गाने कोंडी करण्यात हे लोक मातब्बर आहेत. तरीही भाजपतील महत्त्वाचे लोक, मंत्री आणि आमदार पक्ष सोडून जात आहेत. अखिलेश यादव यांनी प्रत्येक पाऊल जपून टाकले तर अयोध्येतला राम आणि मथुरेतला कृष्ण भाजपच्या नकली हिंदुत्वास सहाय्यभूत ठरणार नाही. भाजपवर ही अशी वेळ का यावी याचे चिंतन करण्याची वेळही निघून गेली आहे.
दरम्यान,पुढे ते म्हणाले की,’गोव्यात, मणिपुरात, उत्तराखंडात निवडणुका रंगतदार होतील. ”आम्हीच जिंकू,आपल्याला कोणाचे आव्हान नाही” असे फुगे कितीही फुगवले तरी प्रत्येक राज्यात भाजपला संघर्ष करावा लागत आहे. पंजाबात भले काँग्रेससमोर अडचणींचा डोंगर आणि अंतर्गत वाद आहेत, पण पंजाबात भाजपला तिसऱया क्रमांकावर राहण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय. चित्र हे असे आहे. याउपरही कुणाला वाटत असेल की आमच्यासारखे आम्हीच, तर त्यास सोप्या भाषेत म्हणावे लागेल, ”गिरे तो भी टांग उपर.”
महत्वाच्या बातम्या:
- ‘सरकार असेल थंड तर आम्ही पुकारू बंड’; भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक
- ‘मुख्यमंत्र्यांचं नक्की चाललंय तरी काय?’; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
- जुनोना तलावाला इकॉर्निया वनस्पतीपासून मुक्त करून कालव्यांची दुरूस्ती करा – सुधीर मुनगंटीवार
- नव्या गाण्यातील डान्सिंग स्टाईलमुळे गोविंदा झाला ट्रोल ; जाणून घ्या कारण
- कोरोना संदर्भात बैठकीनंतर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

