🕒 1 min read
सांगली : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.
दरम्यान, राज्यातील पूरग्रस्त भागात मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं 11 हजार 500 कोटीं रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, कोल्हापूर, कराड, सांगली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर कायमस्वरूपी उपाय करून पुरस्थितीचा प्रश्न मिटवण्यासाठी काही कठोर पावलं उचलण्यासंदर्भात देखील सूचना केल्या आहेत. यासाठी काही गावांचं, कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं होतं.
आता शिये गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी करत थेट पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली. यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण होण्यासह आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं. २००५ साली शिये गावात पुरामुळे गंभीर स्थिती झाली होती. यानंतर २०१९ चा महापूर आणि आता अतिवृष्टीमुळे आलेल्या मोठ्या पुरामुळे हे गाव पाण्याखाली गेलं होतं.
वारंवार येणारा पूर, कुटुंबाची हेळसांड, संसार वाहून जाणे आणि पावसाळ्यात मनातील ही भीती यामुळे गावकरी त्रस्त झाले असून यातून सुटका व्हावी यासाठी पुनर्वसनाची मागणी करत आहेत. प्रशासन आणि सरकार यांच्याकडे वारंवार पुनर्वसनाची मागणी करून देखील ती पूर्ण होत नसल्याने गावकऱ्यांनी पंचगंगेत उडी मारली. यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना नदी बाहेर काढून त्यांना ताब्यात घेतलं.
यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘पुरात मरण्यापेक्षा तुमच्यासमोर नदीत मेलेलं काय वाईट? असे म्हणण्याची स्थिती कधी पूरग्रस्त भागातील नागरिकांवर येत असेल तर मदतीचा नावावर तुम्ही जे पॅकेज जाहीर केले आहे, त्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडले, असे वाटत नाही का तुम्हाला?’ असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारला केला आहे.
आंदोलकांची काय प्रतिक्रिया ?
‘सरकारने आमच्या पुनर्वसनाची मागणी मान्य केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात नदीमध्ये जीव द्यायला देखील मागेपुढे बघणार नाहीत. पुरात मरण्यापेक्षा तुमच्यासमोर नदीत मेलेलं काय वाईट आहे? म्हणून आम्ही आज आंदोलन केलं आहे. आंदोलन केल्यानंतर सरकार आणि प्रशासनाला जाग आली पाहिजे. नाहीतर आम्ही पुन्हा नदीत जीव द्यायला येऊ,’ अशी भावना व्यक्त करत आंदोलक ग्रामस्थाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपला संताप व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे हे टीव्हीवर भूलथापा मारून स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात मशगूल’; महाजनांची टीका
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘2047 सालच्या भारताची परिस्थिती ठरवण्यात आपले कृषिक्षेत्रासह शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची’
- पुणेकरांना दिलासा : निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
