🕒 1 min read
कोल्हापूर : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.
दरम्यान, राज्यातील पूरग्रस्त भागात मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं 11 हजार 500 कोटीं रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, कोल्हापूर, कराड, सांगली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर कायमस्वरूपी उपाय करून पुरस्थितीचा प्रश्न मिटवण्यासाठी काही कठोर पावलं उचलण्यासंदर्भात देखील सूचना केल्या आहेत. यासाठी काही गावांचं, कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं होतं.
आता शिये गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी करत थेट पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली. यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण होण्यासह आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं. २००५ साली शिये गावात पुरामुळे गंभीर स्थिती झाली होती. यानंतर २०१९ चा महापूर आणि आता अतिवृष्टीमुळे आलेल्या मोठ्या पुरामुळे हे गाव पाण्याखाली गेलं होतं.
वारंवार येणारा पूर, कुटुंबाची हेळसांड, संसार वाहून जाणे आणि पावसाळ्यात मनातील ही भीती यामुळे गावकरी त्रस्त झाले असून यातून सुटका व्हावी यासाठी पुनर्वसनाची मागणी करत आहेत. प्रशासन आणि सरकार यांच्याकडे वारंवार पुनर्वसनाची मागणी करून देखील ती पूर्ण होत नसल्याने गावकऱ्यांनी पंचगंगेत उडी मारली. यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना नदी बाहेर काढून त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, ‘आजही काही भाग हा पुरामध्ये राहत आहे. 2019 साली तसेच या वर्षीदेखील मोठा महापूर आला. पुरात अडकलेल्या आमच्या माणसांना बाहेर काढण्यात देखील प्रचंड त्रास झाला. हा त्रास आम्ही भोगलेला आहे. पुढच्या वर्षी देखील पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचे हाल होऊ नये यासाठी आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. सरकारने लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं, अशी माझी राज्य सरकारकडे मागणी आहे,’ अशी भावना एका गावकऱ्याने टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नामांतर शहीद स्मारकाचे काम गतीने करा, आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी!
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- मराठा आरक्षणासाठी पहिलं ‘हे’ करणं गरजेचं; संभाजीराजेंचा राज्य सरकारला सल्ला
- ‘2047 सालच्या भारताची परिस्थिती ठरवण्यात आपले कृषिक्षेत्रासह शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची’
- पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर; 9.75 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
